“ नव्या युगाची,मी नव महिला,
आहे मनस्विनी,
मी न दासी, मी न देवता,
जगेन माणुस म्हणूनी .’’
संदर्भीय काव्यपंक्तीचा सखोल विचार केल्यास मला माझ्या भूतकाळात शिरावे लागेल,आणि त्यातल्या त्यात माझ्या रम्य बालपणात.माझं माहेर पाथरवाला बु.रम्य गोदाकाठी वसलेलं.आई-बाबा दोघेही मध्यमवर्गीय शेतकरी.चौथीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं .रूढी परंपरांनी भारलेल्या त्या समाजात ही माझ्या आई-बाबांनी आमच्या भावंडात मुलगा-मुलगी असा भेद कधीही केला नाही.उलट शाळेला जाताना घरी डबा करायला उशीर झाल्यास दहा किमीच अंतर ओलांडून माझे बाबा झा डबा धावत पळत शाळेत घेऊन यायचे.दहावीला जेव्हा मध्यरात्री पर्यंत जागून मी अभ्यास करायचे तेव्हा माझ्या सोबतच जागून अधून-मधून माझ्या बाबांनी केलेल्या चुलीवरच्या चहाची ती चव अजून ही माझ्या ओठांवर रेंगाळते आहे.तात्पर्य माझ्या आई-बाबांनी मुलगा-मुलगी असा भेद कधीही नकेल्यामुळेच शैक्षणिक प्रशासणात गटशिक्षणाधिकारी म्हणून मी आज जबाबदारीने व मानाने माझे शैक्षणिक कार्य पार पाडत आहे.म्हणून खेड्यापाड्यात पसरलेल्या माझ्या मुलांच्या आई-बाबांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुमच्या मुलींना त्यांच्या स्वप्नांचे पंख गवसेपर्यंत शिकू द्या.
प्रशासणात काम करतांना कौटुंबीक आघाडीवरही आई,पत्नी,मुलगी,बहीण,सूनया सर्वच भूमीकेतून स्रीयांना जावे लागते.पर्यायाने सर्व नाते निभावताना करावी लागणारी तारेवरची कसरत निश्चितच प्रशासणातील विविध जबाबदारया पार पाडत असताना मला नित्य नवी दुष्टी प्रदान करत असतात .अंबड तालुक्याची गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना तालुक्यात शिक्षणात नवे बदल घडविताना स्वच्छ व सक्षम काम कार्यान्वित ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.जि.प.च्या २०८ शाळा असून त्यात २६५२५ विध्यार्थी शिक्षण घेत आहेत व एकूण ८३८ शिक्षक कार्यरत आहेत.
या गटसाधनकेंद्राच्या ब्लॉगच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना संदेश देऊ इच्छिते की,तुमच्यात दडलेल्या सुप्त शक्तींना जागवा.अथक परिश्रम करा.प्रत्येक क्षण विध्यार्थ्यासाठी काहीतरी नवे व चांगले करण्याची जिद्द बाळगा. विध्यार्थ्याचे उज्ज्वल भवितव्य सजवा.परंपरेचा पांगुळगाडा सोडून शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय साधा. माझ्यासह सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व संघटनांचे पदाधिकारी, गटसमन्वयक, विषयतज्ञ, साधनव्यक्ती, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती या सगळ्यांच्या सहयोगमुळे स्वप्न साकार करता येईल..सर्वांचे ऋण व्यक्त करून प्रास्ताविक पूर्ण करते.
श्रीम.मंगल कचरू धुपे
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती,अंबड,जि.जालना.
पंचायत समिती,अंबड,जि.जालना.
No comments:
Post a Comment